शनिवारी पूर्ण बंद असताना भाजी विक्रेत्यांची नियमांचे उल्लंघण करत भाजीविक्री सुरूच

 शनिवारी पूर्ण बंद असताना भाजी विक्रेत्यांची नियमांचे उल्लंघण करत भाजीविक्री सुरूच




मिरारोड -  मीरा भाईंदर महानगर पालिकेने शनिवार व रविवार शहरातील दुकाने व भाजीविक्री पूर्णपणे बंद ठेवले असतानाही शनिवारी सकाळी काशीगाव येथे अवैध रित्या भाजी मार्केट भरलेले दिसून येत आहे. तसेच त्या ठिकाणी लोकांनी भाजी खरेदीसाठी गर्दी केलेली आहे. या भाजी विक्रेत्या फेरीवाल्यावर पोलीस व पालिकेचे  कोणतेही कर्मचारी कारवाई करण्यासाठी येत नसल्यामुळे भाजी विक्रेते बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करत भाजी विक्री करताना दिसून येत आहेत. 

           कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रात " ब्रेक द चेन " मोहिम राबवण्यात येत आहे .कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेने शहरातील भाजी विक्रेत्यासाठी ज्या त्या भागात मैदाने किंवा मोकळ्या जागी भाजी लावण्यासाठी ठिकाणे निश्चित केली आहेत. ही भाजी विक्री सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ११ या वेळेत करता येणार आहे तरीही भाजी विक्रेते हे शनिवारी देखील भाजी विकत असल्याचे दिसून येत आहे. परिसरातील बेजबाबदार नागरिक व आजूबाजूच्या परिसरात लहान लहान भाजी विक्रेते शासनाचे आदेश धुडकावून  मोठ्या संख्येने एकत्र गर्दी करून भाजी खरेदी करताना दिसत आहेत. भाजी विक्रेत्यांकडून पालिकेच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

       मीरा भाईंदर मधील सर्व परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली असून विणाकारण घरा बाहेर वाहन घेऊन पडणाऱ्यावर कारवाई करत आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचारी यात व्यस्त असल्यामुळे भाजी विक्रेते हे  पोलिसांची भीती न बाळगता  भाजी विक्री करत आहेत. हे लोक नाक्यावर बिनधास्त पणे कोणतीही भीती न बाळगता सकाळी ५ वाजल्यापासून भाजी विक्री करत असतात . यामुळे या प्रकरणाकडे पालिका व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने जागरूक नागरीकांनी रोष व्यक्त केला आहे .सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त नागरिकांना गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे तरीही बेजबाबदार नागरिक शासनाचे आदेश धुडकावून भाजीच्या नावाखाली फिरत आहेत यामुळे गर्दी जमा होऊन  कोरोना विषाणूंचा फैलाव होण्याची भीती निर्माण झाली आहे . मिरा भाईंदर मध्ये दिवसेंदिवस करोना बाधितांची संख्या वाढत असताना बेजबाबदार नागरिक जीवाची पर्वा न करता घराबाहेर पडत आहेत . पोलीस व पालिका प्रशासन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे . या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भाजीविक्रेत्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.