प्रभाग अधिकाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मिरारोड - मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग अधिकाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याप्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांना कार्यालयात बसून दारूची पार्टी करत असल्याचा आरोप करत 16 ऑगस्ट रविवारी दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी शिवीगाळ व मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. या घटनेवेळी कार्यालयात उपस्थित असलेले प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे निवृत्त अधिकारी दादासाहेब खेत्रे येथे उपस्थित होते. शीतल नगर येथे एका गटारात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता त्या प्रकरणी प्रभाग अधिकारी यांचा काहीही संबंध नसताना त्यांना दोषी धरत असल्याने त्याचे निवेदन आयुक्त यांना द्यायचे होते ते निवेदन बनवण्यासाठी आम्ही एकत्र जमलो होतो असे प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले. आम्ही दारू पिलेली नाही असे काही वाटत असेल तर वैद्यकीय चाचणी करा असे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत प्रकाश कुलकर्णी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले पोलीस सर्वांना पोलीस ठाण्यात घेऊन आले त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. पालिका कार्यालयात घटना घडल्यानंतर दररोज पालिका अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात चकरा मारत होते तरी गुन्हा दाखल करून घेण्यात येत नव्हता असे पालिका अधिकारी सांगत आहेत. तर पालिका अधिकारी हेच गुन्हा दाखल करण्यासाठी येत नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. त्यांच्या या गोंधळामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर विजय राठोड यांनी दिले होते परंतु पाच दिवस उलटले तरीही गुन्हा दाखल होत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यानी आवाज उठवला होता. मारहाण झाल्याच्या घटनेनंतर तब्बल सहा दिवसांनंतर विकास फाळके, करण कांडनगिरे , सचिन पोफळे , सुनील कदम यांच्यासह 35 व्यक्तीविरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिका प्रशासनाकडे लेखी अहवाल मागितला असून शासकीय कामात अडथळा आला असल्यास त्या अंतर्गत देखील गुन्हा दाखल केला जाईल असे संजय हजारे यांनी सांगितले.