दिवा शहरासाठी सुविधांचे नियोजन,एकाच ठिकाणी उभे राहणार प्रभाग समिती कार्यायल, हॉस्पिटल आणि अन्य सुविधा!
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दिवावासीयांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न!
ठाणे :- दिवा शहराची वाढती लोकसंख्या व नागरीकरण व भविष्याचा विचार करून या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण करणे गरजेचे असून ठाणे महापालिका मार्फत दिव्यातील आगासन येथे प्रभाग समिती कार्यालय,हॉस्पिटल,पोलीस ठाणे व अन्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.या सुविधा उपलब्ध झाल्यानंतर दिव्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दिवा येथील आगासन भागात आरक्षित जागेत सुमारे 35 एकर वर शहरातील नागरिकांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पालिकेमार्फत केला जाणार आहे.दिवा शहरातील आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी याभागात सुमारे 2.4 हेक्टर जमिनीवर सुसज्ज हॉस्पिटल प्रस्तावित आहे.हे रुग्णालय झाल्यानंतर दिवावासीयांची ठाणे, डोंबिवली दरम्यान उपचारासाठी होणारी फरफट थांबणार आहे.रेल्वे कल्याणकारी संघटनेच्या भूखंडात शहरातील नागरी सुविधांसाठी फेरबदल करण्याचा प्रस्तावास याआधीच महासभेने मंजुरी दिली आहे.याच भागात अग्निशमन केंद्र, प्रभाग समिती कार्यालय,पोलीस ठाणे, बस स्थानक,मार्केट या सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.साधारण 35 एकर जागेवर दिवावासीयांच्या सोयी सुविधा साठी हा प्रकल्प उभारला जाणार असून प्रत्यक्षात हे काम सुरू झाल्यानंतर दिवा वासीयांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांबाबत दिलासा मिळणार आहे.दिवा शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता या नियोजित सुविधा लवकर उपलब्ध व्हाव्यात असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.