जिल्हापरिषद शाळेतील शशांक सुनिल नाटकर याची सातारा येथील सैनिक शाळेमध्ये निवड
पाटोदा - फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अखिल भारतीय सैनिक शाळेच्या परिक्षेमधून जि. प. शाळा बेडुकवाडी येथील शशांक सुनिल नाटकर याची सातारा येथील सैनिक शाळेमध्ये निवड झाली आहे .
बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख निर्माण झालेली आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील ग्रा पं दासखेड अंतर्गत बेडुकवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. हा भाग अत्यंत ग्रामीण असून आजपर्यंत या गावांमध्ये एस टी पोहचली नाही.पूर्वी या गावांमध्ये चौथी पर्यंत शाळा होती . गावात जाण्यायेण्याकरिता पक्का रस्ता नव्हता . पाचवी पासून पुढे शिक्षण घ्यायचे म्हटले तर मुलांना ४ किमी चालत दुसऱ्या गावात जावे लागे त्यामुळे अनेक चौथी नंतर अनेक मुलामुलींनी शाळा सोडली . गावकऱ्यांच्या पुढाकाराने २०१३ साली शाळेला इयत्ता पाचवी चा वर्ग जोडला व पुढे इयत्ता सहावी व सातवी पर्यंत वर्ग सुरू केले . २०१४ साली शाळेत बदली होऊन मुसळे सर, कदम सर , रसाळ सर असे तिघे जण आले . नंतर २०१८ साली वाघुले सर आले . सर्वांनी मेहनतीने अध्यापन केले .शालेय अध्यापना सोबतच विध्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घ्यायला सुरुवात केली . आज बेडुकवाडीतील शिक्षकवृंदावर विश्वास ठेवून बेडुकवाडी पासून जवळ असणाऱ्या वैजाळा गावातील पालकांनी त्यांचे १८ विद्यार्थी बेडुकवाडी शाळेत दाखल केले आहेत . १० ते १५ पटसंख्या असणाऱ्या छोट्याशा वाडीत आज ४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . त्याचेच यश म्हणजे फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अखिल भारतीय सैनिक शाळेच्या परिक्षेमधून जि. प. शाळा बेडुकवाडी येथील शशांक सुनिल नाटकर याची सातारा येथील सैनिक शाळेमध्ये निवड झाली आहे . त्याच्या निवडीबद्दल सर्व गावकऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे .