विरारमध्ये विजय वल्लभ कोविड रुग्णालयात भीषण आग
आगीत १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना
विरार - पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये विजय वल्लभ कोविड रुग्णालयात भीषण आगीत 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास विरारमधील कोविड रुग्णालयात आग लागली. यावेळी आयसीयुत असलेल्या १७ पैकी १३ रुग्णांचा मृत्यू झाला तर ४ जणांना वाचवण्यात यश आले. चारही रुग्ण गंभीर असून त्यांना इतरत्र हलवण्यात आले आहे. आयसीयू वॉर्डमध्ये असललेल्या एसीमध्ये शॉर्ट सर्कीट झाल्यानंतर आग लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या इतर रुग्णांनाही दुसऱ्या रुग्णालयामध्ये दाखल केलं जात असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच या आगीच्या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले होते. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.