भाईंदर- करोना काळात जिवाची बाजी लावून सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे 1ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. करोना काळात राज्य शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत आहेत. अशा परिस्थितीत अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे तर काही कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. परंतु अशा कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून कोणत्याही स्वरूपाची मदत करण्यात येत नसल्यामुळे मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांनी एक ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन केले होते. त्यात त्यांनी प्रत्येक कोरोना बाधित कर्मचाऱ्यांना मृत्यू पर्याप्त 50 लाखाचा विमा देणे , मृतक कर्मचाऱ्याच्या जागी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी देणे आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी देण्याची मागणी केली होती. गेल्या सहा दिवसांपासून मुद्रांक विभागातील कामकाज बंद असल्यामुळे रूम रजिस्ट्रेशन करणे , मूल्यांकन करणे तसेच इतर कामं ठप्प झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे राज्य शासनाकडून आंदोलनाची दखल घेत बुधवारी सभा आयोजित करण्यात आल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले असून पुन्हा कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती मुद्रांक विभागातील अधिकारी वी. पी. लाड यांनी दिली आहे.
अखेर मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांचा संप मागे