मेडीकल दुकानातून पैसे उकळल्या प्रकरणि; नवघर पोलिस ठाण्यातील दोन हवालदारांची मुख्यालयात बदली
भाईंदर - भाईंदर पुर्वेच्या नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका मेडीकल स्टोर्स चालकाकडून 20 हजार रुपये बेकायदेशीरपणे उकळल्याची तक्रार दुकानदाराने ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षक शिवाजी राठोड यांच्या कड़े केली होती. अखेर अधिक्षकांनी राऊळ व घुगे या दोन कर्मचाऱ्यांना नुकतेच सेवेतून निलंबित केले.तर हवालदार झांजे व हवालदार ठाकूर यांची ठाणे येथील मुख्यालयात बदली करण्यात आल्याचे पोलिस सूत्राकडुन सांगण्यात आले.
भाईंदर पुर्वेच्या नवघर रोड येथील दर्शन केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट दुकानाचे चालक रामफेर शुक्ला यांनी रेडबूल हे एनर्जी ड्रिंक विकल्याप्रकरणी नवघर पोलिस ठाण्यातील शिपाई किरण घुगे व शिपाई अमोल राऊळ यांनी शुक्ला व दुकानात काम करणाऱ्या फार्मासिस्टला जबरदस्ती पोलिस ठाण्यात कारवाईसाठी नेले. तेथे त्यांना धमकावून त्यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली अथवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन मेडीकल दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. अखेर एक लाखाच्या मागणीवर तडजोड ती वीस हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली. दरम्यान शुक्ला यांचे कपडे काढून दांडक्याने मारण्याची धमकी दिली. त्यावर शुक्ला यांनी कपडे न काढण्याची विनंती करीत उर्वरीत रक्कम आणून देण्याचे आश्वासन त्या कर्मचाऱ्यांना दिले. त्यावेळी पोलिस ठाण्यात वरील दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह हवालदार तुकाराम झांजे व हवालदार बाळकृष्ण ठाकूर उपस्थित होते. शुक्ला यांना धमकावण्यामध्ये ते सुद्धा सहभागी असल्याची तक्रार शुक्ला यांनी ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षक शिवाजी राठोड यांच्याकडे केली होती. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश अधिक्षकांनी उपअधिक्षक शशिकांत भोसले यांना दिले. त्याचा चौैकशी अहवाल उपअधिक्षकांनी अधिक्षकांना सादर केल्यानंतर त्यात त्या चौघा कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले.