खून का बदला खून म्हणत, एकाच्या बदल्यात तिघांची हत्या
शेतीच्या वादातून घडली घटना : मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार
केज - केज तालुक्यातील मांगवडगाव हे गुरुवारी पहाटे तीन खुनांनी हादरून गेले. मागील पंधरा वर्षांपूर्वी निंबाळकर कुटूंबातील मोहन निंबाळकर हे बेपत्ता झाले होते आणि त्यांचा खून हा मयत बाबू पवार व त्याच्या कुटुंबीयांनी केला असा आरोप निंबाळकर कुटुंबीयांनी केला होता. या आरोपातून पवार कुटूंबियांची दोन वर्षापुर्वीच सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता देखील झालेली होती. मात्र अद्यापपर्यत मोहन निंबाळकर यांचा तपास लागलेला नाही. खून करणारेही निर्दोष सुटले याची आग निंबाळकर कुटुंबियांच्या मनात घर करुन होती. त्यातुनच तिघांची हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली.
घटनेची हकीकत अशी की, 15 वर्षापुर्वी पवार कुटुंबियांनी मांगवडगाव शिवारातील स.नं.271 मधील 15 एकर 12 गुंठे जमीन घेतली होती. या जमिनीच्या वादातून पवार, निंबाळकर यांच्यात यापुर्वी तीन वेळा संघर्ष झाला होता. त्यात मोहन किसन निंबाळकर हे बेपत्ता झालेले होते. त्यांचा खून करण्यात आल्याचा आरोप आजच्या घटनेत मयत झालेले बाबू शंकर पवार (70), प्रकाश बाबू पवार (50), संजय बाबु पवार (45) सर्व रा.मांगवडगाव यांच्यावर ठेवण्यात आला होता. या आरोपातून वरील मयतांची दोन वर्षापुर्वी निर्दोष मुक्तता देखील झाली होती. हे सर्वजण अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण चौकाशेजारीच राहात होते.
दरम्यान शेतीच्या उन्हाळी कामासाठी मयत तिघेजण तीन दुचाकी, व मयुर दळवी यांचे ट्रॅक्टरमध्ये बसून बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान मांगवडगाव शिवारातील पारधी वस्तीवर आले होते. ही माहीती निंबाळकर यांना समजताच सचिन मोहन निंबाळकर आणि हनुमंत उर्फ पिंटु मोहन निंबाळकर या दोघांनी आपल्या सोबत 9 ते 10 जणांना घेतले. सर्वांच्या हातात तलवार, कुर्हाड, लोखंडी सळई व काठी होती. हे सर्वजण मांगवडगाव शिवारातील पवार यांच्या शेतात आले. यावेळी तेथे असलेले ट्रॅक्टरचे हेड बाबू शंकर पवार यांच्या अंगावर घालून त्यांना जागीच ठार करण्यात आले. काही कळण्याच्या आत ही घटना घडल्याने पारधी वस्तीवरील सर्वच जण सैरावैरा पळू लागले. त्यावेळी आरोपींनी प्रकाश बाबु पवार, आणि संजय बाबु पवार, या दोघांचा पाठलाग करून त्यांना हातातील शस्त्राने मारहाण केली. यात ते दोघेही जागीच ठार झाले. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती युसूफवडगाव पोलीसांना समजताच त्यांनी तत्काळ परिसराची नाकेबंदी करून आरोपींना राहत्या घरातून व निंबाळकर वस्तीवरील शेतातून ताब्यात घेतले.
या प्रकरणी धनराज बाबू पवार याच्या फिर्यादी वरून सचिन मोहन निंबाळकर, हनुमंत उर्फ पिंटू मोहन निंबाळकर आणि इतर 9 ते 10 आरोपी विरोधात युसूफवडगाव पोलिसात गुरंनं 106/20 कलम 143, 147, 148, 149, 302, 307, 435, 427, 120(ब) भादंवि, अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 चे कलम (3)(1), (2), (9) आणि मोटार वाहन अधिनियम 1954चे कलम 4, 25, व 184 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करीत आहेत.