विधान परिषद निवडणूक : बीडमधून पंकजा मुंडेंना मिळणार संधी ?
मुंबई - निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रखडलेल्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता याबाबत राजकीय वर्तुळातून शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यातल्याचं एक शक्यतेनुसार परळी विधानसभा मतदारसंघातून धक्कादायक पद्धतीने पराभूत झालेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची येणाऱ्या विधान परिषदेवर वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे.
विधानसभेच्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी राज्यातील नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान स्थापन करून सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. त्याच वेळी त्यांची अपेक्षा विधानपरिषदेची होती किंवा त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळावे अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा होती. पण या दोन्ही गोष्टी यावेळी झाल्या नाहीत.
मुंडेंच्या या नाराजीची दखल मात्र भाजपच्या वरिष्ठ पातळीवर घेतली गेली. त्यामुळे 21 मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या नियुक्त्यांमध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो. सध्या त्या वैयक्तिक पातळीवर ऊसतोड मजुरांना परत त्यांच्या घरी आणण्यासाठी झटत आहेत. त्यापैकी जे लोक बीड जिल्ह्यात परत आले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी त्या सरसावल्या आहेत.
यावेळेस भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारली तर भविष्यात त्याची मोठी किंमत पक्षाला चुकवावी लागेल. त्यामुळे भाजप यावेळेस पंकजा मुंडेंची उमेदवारी नाकारू शकत नाहीत, असे म्हंटले जात आहे.
दरम्यान कोरोनामुळे विधान परिषदेच्या 9 जागांसाठी रखडलेल्या निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबतचा प्रस्ताव टाकला होता. यावर आता निवडणूक आयोगानेही हालचाल केली आहे. तर आता 21 मेला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा राजकीय धुराळा उडणार आहे.