कोरोनाच्या तपासणीसाठी आणलेले दोघे जिल्हा रुग्णालयातून फरार
बीड : सिरसाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन आरोपी कोरोनाच्या रुटीन तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र हे दोघेही रात्री उशीरा वार्डातून फरार झाले. ते गांधीनगर परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यांना पकडण्यासाठी गेल्यानंतर दोघेही गच्चीवर गेले. यावेळी त्यांना पकडतांना घराचे पत्रे अंगावर पडल्याने एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी तालुक्यातील सिरसाळा येथील पोलिसांनी 2 मे रोजी कलम 307, 504,506 गुन्ह्यात दोन आरोपींना अटक केली होती. सोमवारी सकाळी त्या दोघांना बीड येथील जिल्हा कारागृहात आणण्यात आले. मात्र शासन आदेशानुसार कारागृहात आणण्यात येणार्या प्रत्येक आरोपीची आधी कोरोना टेस्ट करणे आवश्यक असल्याने कारागृह प्रशासनाने त्यांना जिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी पाठवले. दोन्ही आरोपींना आयसोलेशन वार्डात दाखल करून त्यांचे स्वॅब देखील तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र रात्री उशिरा दोघेही जिल्हा रुग्णालयातून फरार झाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने शोध मोहिम राबवली असता दोघेही गांधीनगर भागातील एका घरामध्ये लपल्याची माहिती मिळाली. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि.भारत राऊत सहकार्यांसह रात्री 1 वा. त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी घरात लपलेल्या आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करण्यात आला. मात्र गच्चीवरून दोन्ही आरोपी फरार झाले. यावेळी आरोपींचा पाठलाग करत असतांना घराचे पत्रे खाली पडल्याने पोलिस कर्मचारी शेख अन्वर हे जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असुन हाताला आणि पायालाही मार लागला आहे. याप्रकरणी फरार दोन्ही आरोपींविरूद्ध कलम 224 प्रमाणे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.