बीड जिल्ह्यात विनापास ये-जा केल्याप्रकरणी व्यवस्थापकावर गुन्हा

बीड जिल्ह्यात विनापास ये-जा केल्याप्रकरणी व्यवस्थापकावर गुन्हा


बीड : कोरोनामुळे जिल्ह्याबाहेर जाण्यास व जिल्ह्यात प्रवेश करण्यास जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मनाई करण्यात आलेली आहे. असे असतांना कुठलाही पास नसतांना बीड येथील जालना रोडवरील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. यांचा अधिकारी जिल्ह्यात ये-जा करत होता. त्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     या संदर्भात जन आंदोलनचे अ‍ॅड.अजित देशमुख यांनी पास नसतांनाही जिल्ह्यात ये-जा करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली होती. याची दखल घेत वरिष्ठ अधिकारी यांनी शहर पोलीस ठाण्यास चौकशीचे आदेश दिले होते. शहरातील जालना रोडवर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि, आहे. या कंपनीचे बीडचे व्यवस्थापक मिलिंद तापकिर हे सोलापूरला विना पास ये-जा करत होते. याची कुठलीही माहिती पोलीसांना दिली नाही. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍याच्या फिर्यादीवरुन 188, 269, 270 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार शिंदे हे करत आहे.