औरंगाबादमध्ये  कोरोना रुग्णांच्या संख्येत होतेय झपाट्याने वाढ ,   कोरोनाबाधितांचा आकडा ५४५ वर

औरंगाबादमध्ये  कोरोना रुग्णांच्या संख्येत होतेय झपाट्याने वाढ , 
 कोरोनाबाधितांचा आकडा ५४५ वर


औरंगाबाद - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. अशातच औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांचा आकडाही अतिशय वेगाने वाढत चालला आहे. औरंगाबाद शहरात दिवसभरात नवीन ३७ रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबधितांचा आकडा ५४५ वर पोहोचला आहे.
औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांच्या रुग्णामध्ये  सातत्याने वाढ आहे. रविवारी सकाळीच २१ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यानंतर दुपारी आणखी १६ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे हा कोरोनाबाधितांचा आकडा ५४५ वर पोहोचला आहे. अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लड्डा यांनी दिली आहे.
औरंगाबादमधील रामनगर, चंपा चौक आणि गुरूदत्त नगर अशा आणखी काही  परिसरातील नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एका ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबळींची संख्या १३ वर पोहोचली आहे.  आज मृत्यू झालेल्या व्यक्तीला  मधुमेह आणि किडनीचा आजार होता. 
औरंगाबादमध्ये १५ मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. या रुग्णानंतर बाधितांचा आकडा हळूहळू वाढू लागला. गेल्या १५ दिवसापासून दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ  होत चालली आहे . हा आकडा पाचशेच्या पुढे गेल्याने घरात नागरिक व प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन काळजी घेत आहे. शहरातील नागरिकांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रशासनाबरोबरच काळजी घेणे ही नागरिकांची मोठी जबाबदारी आहे.