दारुवर लागणार कोरोना कर
मुंबई - कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनचा हा तिसरा टप्पा असून सरकारने महसुलाचा विचार करत झोन निहाय दारु दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही जिल्ह्यामध्ये दारु दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली तर काही जिल्ह्यात अजुनही दारु दुकाने बंदच आहेत. जिथे दारु दुकाने सुरु झाली त्या ठिकाणी मद्यप्रेमींच्या रांगाच रांगा पहायला मिळाल्या. यामुळे दिल्ली सरकारने ही गर्दी कमी करण्यासाठी दारुवर 70 टक्के कोरोनो कर लावण्याचा नविन निर्णय घेतला आहे. यामुळे 100 रुपयांना मिळणार्या दारुच्या बाटलीसाठी 170 रुपये मोजावे लागणार आहेत.
दिल्ली सरकारने एमआरपीवर 70 टक्के करोना कर लावला आहे. हा निर्णय घेऊन दिल्ली सरकारने दारू पिणार्यांना मोठा झटका दिला आहे. हरयाणा सरकारनेही अशाच प्रकारे दारूवर अधिकचा कर लावून तळीरामांना धक्का दिला आहे. दिल्लीत दारूची दुकानं उघडताच काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. तर अनेक ठिकाणी दारु खरेदीसाठी मद्यप्रेमींनी रांगाच रांग लावत गोंधळ केला. या संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी नाराजी व्यक्त केली. दारू दुकानं खुली करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारने त्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. दिल्लीत दारू दुकानांबाहेर घडलेल्या घटना विचलीत करणार्या असल्याचेही ते म्हणाले.
दारुवर लागणार कोरोना कर