दुकानदारांकडून 20 हजार उकळल्याप्रकरणी,
नवघर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचारी निलंबित
भाईंदर - भाईंदर पुर्वेच्या नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दर्शन केमिस्ट मेडिकल दुकानदारांकडून दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी पैसे मगितल्याची तक्रार पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांच्याकडे दाखल केल्यामुळे नवघर पोलिस स्टेशन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तक्रारीची दखल घेत त्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याचा आदेश काढला आहे.
भाईंदर पूर्वेला नवघर रोडवर दर्शन केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट हे दुकान आहे. दुकानाचे चालक रामफेर शुक्ला यांनी कोरोनाचा लॉकडाऊन असताना या कालावधीत रेडबूल या एनर्जी ड्रिंकचे टिन विकल्याप्रकरणी नवघर पोलिस ठाण्यातील शिपाई किरण घुगे व शिपाई अमोल राऊळ यांनी शुक्ला व दुकानात काम करणाऱ्या फार्मासिस्टला पोलिस ठाण्यात कारवाईसाठी आणले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांना धमकावून त्यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल व तीन महिने तुम्हाला जेलमध्ये राहावे लागेल तसेच मेडीकल दुकानाचा परवानाही रद्द करण्यात येईल, अशी धमकी दिली. या दोघांच्या मध्यस्थी साठी एका व्यक्तीच्या मध्यस्थीने तडजोड करून वीस हजार रुपयात मध्यस्थी झाली. तत्पूर्वी शुक्ला यांच्या शर्टाच्या खिशातील सात हजार रुपये त्यांनी काढून घेत उर्वरीत रकमेसाठी त्यांच्या बोटातील अंगठी काढण्याचा प्रयत्न केला. अंगठी काढण्यात अपयश आल्यानंतर त्यांनी त्यांचे कपडे काढून दांडक्याने मारण्याची धमकी दिली. त्यावर शुक्ला यांनी कपडे न काढण्याची विनंती करीत उर्वरीत रक्कम आणून देण्याचे आश्वासन त्या कर्मचाऱ्याना दिले. यानंतर शुक्ला यांनी त्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधून रक्कम घेण्यास बोलवले. दरम्यान शुक्ला यांनी ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षक शिवाजी राठोड यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. अधिक्षकांनी त्याची गंभीर दखल घेत याप्रकरणी शुक्ला यांना लेखी तक्रार देण्यास सांगितले. त्याची चौकशी करण्याचे आदेश अधिक्षकांनी भाईंदर विभागाचे पोलिस उपअधिक्षक शशिकांत भोसले यांना दिले. उपअधिक्षकांनी चौकशी अहवाल अधिक्षकांना सादर केल्यानंतर अधिक्षकांनी बुधवारी त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश काढले. दरम्यान शुक्ला यांनी हि तक्रार मागे घ्यावी, यासाठी काही तथाकथित लोकांकडून त्यांच्यावर सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे शुक्ला यांनी सांगितले.