मुख्यमंत्र्यांचा रात्री ११.३० ला निलंगा तहसीलदारांना फोन करून केले कामाचे कौतुक
निलंगा - राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राज्यासमोरील कोरोनाचे भयावह संकट सक्षमपणे हाताळत आहेत.राज्याचे प्रशासन या आपत्कालीन परिस्थितीमध्ये झोकून देवून काम करत असल्यामुळे राज्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात राज्य सरकारला यश आले आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दस्तुरखुद्द मुख्यमंत्री फोनवरुन संवाद साधून नेमकी परिस्थिती जाणून घेवून त्यांच्या कार्याची दखल घेत आहेत.एवढेच नव्हे तर संबंधित अधिका-याचे कौतुक करुन स्वतःची व आपल्या कुटूंबाची काळजी घेण्यास देखील सांगायलाही ते विसरत नाहीत.
प्रशासनातील आपल्या सारखे अधिकारी व कर्मचारी कौतुकास्पद काम करत असल्यामुळेच राज्य सरकार कोरोना या संकटाचा मुकाबला यशस्वीपणे करत असून याचे संपूर्ण श्रेय राज्यातील जनता व प्रशासनाला जाते असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात.याचा प्रत्यक्ष अनुभव निलंगा तालुक्याचे तहसीलदार गणेश जाधव यांना आला आहे. त्याच असं झालं की, शनिवारी रात्री ११.३० ला तहसीलदार जाधव यांचा फोन खणाणतो.तहसीलदार फोन उचलतात तर फोनवर चक्क मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक!तहसीलदार गणेश जाधव बोलत आहात का ? मुख्यमंत्री साहेब आपणास बोलणार आहेत असे ते म्हणतात.एवढ्यात मुख्यमंत्री बोलायला सुरुवात करतात. आपली विलगीकरण कक्षातील रुग्णासोबतच्या संभाषणाची आॕडिओ क्लिप मी ऐकली.ती मला आवडली असून आपले काम चांगले चालू आहे.त्याबद्दल आपले अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा देवून मुख्यमंत्री ठाकरे यांनी तहसीलदार जाधव यांना सुखद धक्का दिला.निलंग्यात नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेतले.स्वतःची व कुटूंबाची काळजी घेण्याबाबत तहसीलदार यांना सांगण्यास देखील मुख्यमंत्री विसरले नाहीत.मुख्यमंत्री साहेबांचा फोनवरील संवाद निश्चितच आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याची भावना तहसीलदार जाधव यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांचा रात्री ११.३० ला निलंगा तहसीलदारांना फोन करून केले कामाचे कौतुक