बिअरबारच्या मागच्या दरवाज्यातून दारु विक्री
बीड - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश आहेत. असे असतांना परळीमध्ये बंद बिअरबारच्या मागच्या गेटमधून दारु विकतांना परळी शहर पोलीसांनी पकडले. यावेळी एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबेजोगाई रोडवर हॉटेल सपना बिअरबार अॅण्ड परमीट रुम आहे. परळी शहर पोलीस सोमवारी गस्त घालत असतांना अवैधरित्या दारु विक्री होत असल्याची माहिती मिळाली. या बिअरबारवर पंचासमक्ष छापा मारला. यावेळी समोरच्या बाजुला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक यांचे सिल दिसले. तर मागचे गेट उघडे होते. मागच्या गेटमधून आत प्रवेश केल्यानंतर सुनिल चंद्रकांत देवरे, सुरेश बाबुराव वाघमारे हे दोघेही विदेशी दारुची विक्री करतांना आढळून आले. यावेळी विदेशी १ लाख ६ हजार १०५ रुपयांची दारु जप्त करण्यात आली. या प्रकरणी दोघांवर परळी शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उप अधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.हेमंत कदम, सपोनि.एकशिंगे, पोहेकॉ.बांगर, पोना.मुंडे, पोना.केेंद्रे, पोशि.भताने, पोशि.बड्डे यांनी केली.
बिअरबारच्या मागच्या दरवाज्यातून दारु विक्री