बीड पोलिसांचे सर्वच नमुने निगेटिव्ह
बीड : लातूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या तबलिगी जमातच्या 8 कोरोनाग्रस्तांनी गेवराईराजवळील शहागड चेकपोस्टवर पोलीसांशी हुज्जत घातल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे शहागड, चौसाळा चेकपोस्टवर तैनात असलेले पोलीस, होमगार्ड, जिल्हा परिषदेचे कर्मचारी मिळून असे 33 जणांचे नमुने काल रात्री घेण्यात आले होते. तर अन्य एकाचा स्वारातीमध्ये नमूना घेण्यात आला होता. अखेर या अहवालांची प्रतिक्षा संपली असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण नाही. बीड जिल्हा रुग्णालयातून आणि स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथून एकूण 98 नमूने घेण्यात आले होते. त्यापैकी 64 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. काल पाठविलेल्या 34 जणांच्या रिपोर्टची जिल्हा प्रशासनासह नागरिकांनाही प्रतिक्षा होती. एक तासापूर्वी अंबाजोगाईतील एकाचा अहवाल निगेटिव्ह आला. आता बीड पोलिसांसह होमगार्ड, जिल्हा परिषदेचे कर्मचार्यांचे 33 नमुनेही निगेटिव्ह आले आहेत. कोरोना सदृश्य आजारची आपल्या गावात कोणालाही लक्षणं आढळून आल्यास त्यांची माहिती ताबडतोब आरोग्य विभागाला द्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी केले आहे