मेडिकल चालकांची बेमुदत बंदची हाक!
बीड - शहराच्या बशीरगंज चौकातील क्वॉलीटी मेडिकलचे मालक शेख मुमताज यांना नगरपालिकेचे सीओ डॉ.उत्कर्ष गुट्टे यांनी मारहाण केल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे बीड जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने आजपासुन बेमुदत बंदची हाक दिली. त्यामुळे आता शहरातील औषध विक्रेत्यांचेही लॉकडाऊन सुरू झाले आहे.
शहरातील सर्व औषध विक्रेत्यांनी आजपासुन बेमुदत लॉकडाऊन सुरू केल्याने सकाळपासून सर्व मेडिकल स्टोअर्स् बंद होत्या.2 एप्रिल रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.गुट्टे यांनी क्वॉलीटी मेडिकलचे मालक शेख मुमताज यांना अशोभनिय भाषा वापरून मारहाण केल्याचा आरोप आहे. याबाबतची तक्रार शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली. मात्र अजुनही त्याची दखल घेतली नसल्याचे जिल्हाधिकार्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात अखिल भारतीय केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आ.जगन्नाथ शिंदे यांनी स्वत: पोलिस अधिक्षक कार्यालयाशी संपर्क साधुन संबंधीत अधिकार्याविरूद्ध दिलेल्या तक्रारीची नोंद करून घेण्याची विनंती केली होती. मात्र पोलिसाकंडुन यासंदर्भात टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत असोसिएशनने आजपासून शहरातील सर्व औषध दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकावर असोसिएशनचे अध्यक्ष अरूण बरकसे, सचिव सुरेश पवार यांची स्वाक्षरी आहे. सदरील निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, पालकमंत्री धनंजय मुंडे आदींना फॅक्सद्वारे पाठवण्यात आल्या आहेत.