तीन शिक्षकांसह सहा जणांवर गुन्हा
बीड: देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री घरा बाहेर पडू नका असे कळकळीचे आवाहन करत आहे. या नियमाचे सर्वजण पालन करत आहेत. परंतु सध्या गुरुजींचे मन मात्र घरात रमत नसल्याचे पोलिसांच्या कारवाई वरून दिसत आहे. कधी जुगार अड्डा, कधी दारू पिताना गुरुजी पकडले जात आहेत. बीड तालुक्यातील म्हसोबा फाटा परिसरात एका आलिशान गाडीमध्ये दारु पिताना तीन शिक्षकासह सहा जणांना पकडून त्यांच्यावर बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेक आसाराम गव्हाणे, शरद महारुद्र गव्हाणे, पंढरीनाथ दिलीप नवले या तीन शिक्षकासह वैभव विष्णुदास डेंगळे, शिवराज संदीप बहिर, ज्ञानेश्वर रामदास डेंगळे हे म्हसोबा फाटा परिसरात एका इनोव्हा (एमएच 12 एमडब्लू 4967) गाडीमध्ये दारू पित बसले होते. बीड ग्रामीण पोलीस गस्तीवर असताना सहज यांची चौकशी केली. यावेळी यांच्याकडे कुठलाही अत्यावश्यक पास नव्हता, फक्त दारू पिण्यासाठी घराबाहेर पडले असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून दारूचे ग्लास, दारु जप्त करत कलम 188, 269, 270 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (ब), महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम, महाराष्ट्र कोवीड अधिसूचना नियम 2020, 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी.सुरेश माळी, पोकॉ.सानप,पोना.तानाजी डोईफोडे यांनी केली आहे.