शेततळ्यात बुडून एकाच कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू
दोन दिवसात पाण्यात बुडून दहा जणांचा मृत्यू
पैठण : शनिवारी विविध ठिकाणी पाण्यात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेस 24 तास उलटत नाही तोच रविवारी पुन्हा विहामांडवा येथे शेततळ्यात पोहत असताना जीवरक्षक दोर तुटल्याने पाण्यात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये चार विद्यार्थी व एक इसमाचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील हे पाच जण असल्याने या कुटुंबावर मोठा दु:खा चा डोंगर कोसळला आहे. लक्ष्मण निवृत्ती कोरडे (42), वैभव रामनाथ कोरडे (12), सार्थक लक्ष्मण कोरडे (9), समर्थ ज्ञानदेव कोरडे (7), अलंकार रामनाथ कोरडे (9) अशी मृतांची नावे आहेत. लक्ष्मण कोरडे व त्यांचा मुलगा सार्थक यांच्यासह वैभव व अलंकार कोरडे या दोन सख्खा भावांचा समावेश आहे. रविवारी (दि.12) दुपारच्यासुमारास कोरडे वस्तीवरील लक्ष्मण कोरडे हे मुलगा व पुतणे यांना पोहणे शिकविण्यासाठी वस्तीवरील शेततळ्यात घेऊन गेले. दरम्यान, पोहताना बुडू नये म्हणून दोर शेततळ्यात सोडण्यात आली होती. सुरवातीला लक्ष्मण कोरडे हे शेततळ्यात मुलांसोबत होते, मुलांना दोर धरूण पोहण्याच्या सूचना दिल्यानंतर ते बाहेर आले. लक्ष्मण कोरडे बाहेर येताच काही वेळातच शेततळ्यात बांधलेला दोर तुटला व चारही मुले पाण्यात बुडू लागली यावेळी मुलांनी केलेला आरडाओरडा लक्ष्मण कोरडे यांच्या कानावर पडला त्यांनी धावत जात शेततळ्यात मुलांना वाचविण्यासाठी उडी मारली. परंतु, दोर तुटलेला असल्याने व शेततळे शेवाळलेले असल्याने त्यांनी मदतीसाठी धावा केला मात्र ऐकण्यासाठी कुणीही नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही, शेवटी पाचही जण पाण्यात बुडाले. घटना समजताच सर्वांना पाचोड येथील रूग्णालयात हलविण्यात आले, मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. पैठण तालुक्यात दोन दिवसात दहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू ओढवल्याने तालुकाभर शोककळा पसरली आहे. खेळते बागडते चार बालके व एक तरूण गेल्याने कोरडे वस्ती सुन्न झाली आहे. बालकांच्या मातांनी केलेला आक्रोश हेलावून टाकणारा होता. दरम्यान विहामांडवा येथील नागरिकांनी वस्तीवरील नागरिकांना धीर दिला आहे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीला पाचोड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी नातेवाईकांनी व नागरिकांनी एकच गर्दी केली याबाबत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शेततळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांमध्ये सात जणांचा मृत्यू हा शेततळ्यामध्ये बुडून झाला आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेततळ्यात बुडून दुर्घटना होऊ नये म्हणून उपाय योजना राबविणे गरजेजे आहे.