अत्याचार प्रकरणी अख्ख कुटूंब पोलीस कोठडीमध्ये
चौघांना चार दिवसांची कोठडी
अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात
केज : तालुक्यातील एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्याने तीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणातील सर्वच आरोपींना अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हा न्यायालयात शुक्रवारी हजर केले असता चौघांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तर एका अल्पवयीन आरोपीस बाल सुधार गृहात पाठविण्याचे आदेश देण्यात आले. या सर्वांना पुन्हा 8 एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
तालुक्यातील एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्याने पोटच्या तीन मुलींवर लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून गुरुवारी सायंकाळी प्राचार्य, पीडित मुलींची आई, भाऊ, चुलते आणि चुलतभाऊ अशा पाच जणांविरूद्ध कलम 376, (एफ) (एन) (3) 354 (ए) (1) 324, 323, 504, 506, 34 भादंवीसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याचे कलम 4, 6, 8, 10, 12 व 17 या कलमान्वये गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणातील सर्वच आरोपींना पोलिसांनी अटक करून शुक्रवारी अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हा न्यायालयात हजर केले होते. न्यायाधिशांनी या प्रकरणातील आरोपी पिडित मुलीचे वडील, आई, चुलते व चुलतभाऊ या चौघांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर भाऊ हा अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चेलाही उधान आले आहे.