दारू बंदी असताना चोरून दारू विक्री करणाऱ्या हॉटेल मालकावर पोलिसांची कारवाई
भाईंदर - देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. संचारबंदीमुळे फक्त अत्यावश्यक वस्तू पुरवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.
तरीही या संचारबंदीच्या काळात हॉटेल मालकाकडून चोरून दारू विक्री केली जात होती. त्या हॉटेल मालकावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
संचारबंदीमुळे शहरातील सर्व प्रकारचे हॉटेल, बियरबार आणि सार्वजनिक ठिकाणं देखील पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. खाद्य पदार्थ व मद्य विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीही काही हॉटेल आणि बार मालकांनी छुप्या पद्धतीने चढ्या भावाने चोरून मद्य विक्री करण्यास सुरुवात केलेली माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. त्याचा तपास करत असताना भाईंदर येथील न्यू गोल्डन नेस्ट येथे असलेल्या एक्वा बार एन्ड रेस्टोरंटचा मालक संचारबंदीच्या काळात चोरून मद्य विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना. प्रदीप टक्के आणि संजय शिंदे यांनी तपास केला असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे यांनी सापळा रचून माहितीची खात्री करून घेतल्यानंतर हॉटेल एक्वा चा मालक गोपी नरसय्या नायडूं हा चोरून मद्य विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाल्या नंतर १७ एप्रिल रोजी हॉटेलवर धाड टाकून ६० बॉक्स बियर, वाईन आणि इतर विदेशी दारु असा अंदाजे दोन लाख सात हजार रुपयांची दारू जप्त केली आहे . या प्रकरणी पोलिसांनी १२५/२०२० नुसार भा द वि स चे कलम १८८ , २६९, २७०, म प्रोव्ही. ऍक्ट ६५(ई) , कोविड १९ उपाय योजना २०२० चे नियम ११ नुसार हॉटेल मालक गोपी नरसय्या नायडू यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुटे, पोलीस उप निरीक्षक चेतन पाटील, सहा. फौजदार चंद्रकांत पोशिरकर , अनिल वेळे , पो. हवा. अर्जुन जाधव. अशोक पाटील, संदीप शिंदे, किशोर वडिलें, अविनाश गर्जे, पो. ना. संजय शिंदे, प्रदीप टक्के, पुष्पेंद्र थापा, सचिन सावंत, पो. शि. सतीश जगताप, राजेश श्रीवास्तव, महेश वेल्हे, विकास राजपूत, जयवंत कांडेलकर या सर्व पोलिसानी कारवाई केली असून आता स्थानिक गुन्हे शाखा पुढील तपास करीत आहे. संचारबंदी सुरू असल्यापासून अशाच प्रकारे शहरात अनेक हॉटेल मालक चोरून दारू विक्री करीत आहेत. तसेच शहरात अनेक ठिकाणी बंदी असलेला गुटखा आणि पान मसाला देखील मोठ्या प्रमाणात चढ्या भावाने विकत असल्याचेही सांगितले जाते. मिरा-भाईंदर शहरात चोरून दारू विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केल्यामुळे लोक घाबरून दारू विकणार नाहीत
तसेच कोणीही अशी चोरून दारू विकू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.