कवितांजलीचे व्हॉटसअप विडिओ रुपात प्रथमच ऑनलाईनद्वारे आगळे वेगळे कविसंमेलन
भाईंदर - विकास व संशोधन प्रतिष्ठान (DRF) आयोजित 'कवितांजली'चे पर्व-2 मधील ११ वे आणि सातत्यपूर्ण व सलग असे २३ वे खुले कविसंमेलन, १९ एप्रिल २०२० रोजी, व्हॉटसअप ऑनलाईनद्वारे आगळ्या वेगळ्या पध्दतीने उत्साहात संपन्न झाले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन जोरदार साथ पसरत असल्याने विश्वभरातील माणसं हैराण झाली आहेत. कवितांजली परिवाराने रोगाचा संसर्ग व प्रसार रोखणे आणि टाळण्यासाठी सामाजिक भान ठेवून 23 वे कविसंमेलन व्हॉटसअपद्वारा ऑनलाईन रुपात प्रथमच कवी संमेलनाचे आयोजन केले होते. कवींचा प्रतिसादही उत्तम व उत्साहपूर्ण होता. आपली रचना विडिओ स्वरुपात कवितांजलीकडे पाठवून अठरा निवडक कवींनी सहभागी होऊन मौलिक योगदान दिले. विशेष म्हणजे विलास सातपुते व डाॅ. मधुसूदन घाणेकर हे ज्येष्ठ कवी पुण्यातून आॅनलाइन सहभागी झाले. सरस्वती पूजन व दीप प्रज्वलित करून संमेलनाची सुरुवात झाली. स्वतःच्या घरात राहूनच आॅनलाइन संमेलनाचे प्रमुख अतिथी उद्योजक श्रीपत मोरे, शंकर जंगम, प्रतिष्ठानच्या विश्वस्त सौ. वसुंधरा शिवणेकर उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मण शिवणेकर होते.
यातील सहभागी कवी/कवयित्री यांनी विविध विषयांवर आपल्या स्वरचित कविता सादर करून कवी संमेलन बहारदार केले.
सदर कवी संमेलनाचा आस्वाद सर्व कवी/कवयित्री यांचे सोबत त्यांच्या कुटुंबीयांनी प्रत्येकाचे घरी बसून दिलेल्या वेळेत तेवढ्याच रसिकतेने घेऊन मायबोली मराठी भाषेची साहित्यिक परंपरा अभिमानाने जपली.
सहभागाबद्दल सर्व कवींना सन्मानपत्र ऑनलाईन प्रदान करून गौरविण्यात आले.
प्रथमच आॅनलाइन कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या विश्वस्त राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका वसुंधरा शिवणेकर, विजय म्हामुणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रसाद गाळवणकर यांनी तांत्रिक साहाय्य देऊन मोलाची मदत केली. कवी विजय म्हामुणकर यांनी कवी, त्यांचा परिवार आणि इतर सर्व ज्ञात अज्ञात सहभागी व्यक्तींचे आभार मानले. तसेच 17 मे 2020 रोजी संपन्न होणार्या दुसर्या वर्धापनदिनानिमित्त सुसज्ज राहण्याचे आवाहन केले. राष्ट्रगीताने कविसंमेलनाची सांगता झाली.
सहभागी कवी:
डॉ. लक्ष्मण शिवणेकर, विलास सातपुते, डॉ. मधुसूदन घाणेकर, शंकर जंगम, विजय म्हामुणकर, रवींद्र कारेकर, विठ्ठल घाडी, डॉ.दिवाकर चुनारकर, नितेश सरवणकर, भारत कवितके, गिरीश शेजवाडकर, कल्पना म्हापूसकर, शाहीर दत्ताराम म्हात्रे, सुरेखा पाटील, लक्ष्मण शेडगे, किशोरी पाटील, चंद्रशेखर परांजपे, सरोज गाजरे हे कवी सहभागी झाले होते.