शेतकर्‍यांना फिरुन फळे, भाजीपाला थेट ग्राहकापर्यंत विक्री करता येणार

शेतकर्‍यांना फिरुन फळे, भाजीपाला थेट ग्राहकापर्यंत विक्री करता येणार


बीड - कोरोनाच्या संकटात सापडलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळणारी बातमी आहे. जिल्हाधिकार्‍यांनी आता नोंदणीकृत शेतकरी उत्पादन कंपनी, शेतकरी संघ, शेतकरी गटांना फळे, भाजीपाल्याची थेट ग्राहकास विक्री करण्याची परवानगी रविवारी आदेशान्वये दिली आहे.
   जिल्हाधिकारी रेखावार यांनी रविवारी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीची संकल्पना राबवत फळे व भाजीपाला यांचा सुरळीत पुरवठा होणे करीता शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी संघ, शेतकरी गट यांना शहरात घरोघरी फिरुन भाजीपाला व फळे विक्री करावयाचे असल्यास त्यांनी कृषी विभाग अंतर्गत कार्यरत कृषी सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ( बीटीएम), सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (एटीएम), मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचे कडे आपले कडील उपलब्ध फळे, भाजीपाला, शेतीमाल याची नोंदणी करावी. नोंदणीनुसार सदर गट यांना फळे व भाजीपाला विक्रीचा परवाना व वाहन परवाना तालुका स्तरावर दिला जाईल. सदर शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी संघ यांना दिलेल्या परवानानुसार सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नेमुन दिलेल्या ठिकाणी, विभागात फिरून भाजीपाला विक्री करावा लागेल. परवानगी देण्यासाठी तालुकास्तरावर समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचा शेतकर्‍यांना मोठा लाभ होणार आहे.