बीड पोलीस दलात तीन सॅनिटायझर व्हॅन दाखल

बीड पोलीस दलात तीन सॅनिटायझर व्हॅन दाखल


बीड : संसर्गजन्य कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस काम करत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी बीड पोलीस दलामध्ये तीन सॅनिटायझर व्हॅन दाखल झाल्या आहेत. शनिवार १८ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या हस्ते या व्हॅनचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. बीड जिल्ह्यातील सर्व उपविभागामध्ये या तीनही व्हॅन फिरतीवर राहणार आहेत. जिल्ह्यातील चेकपोस्ट तसेच नाकाबंदीसाठी नियुक्त असणार्‍या अधिकारी कर्मचारी यांना बंदोबस्ताला जाताना व बंदोबस्त संपल्यानंतर परतताना या सॅनिटायझर व्हॅनमधून कर्मचार्‍यांना बाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होणार आहे. सॅनिटायझरची व्यवस्था या व्हॅनमध्ये केली गेली आहे. त्याचे फवारे या व्हॅनमधून बाहेर पडतात, जेणेकरुन निर्जंतुकीकरण तात्काळ होते. जिल्ह्यातील बीड, आष्टी, केज, माजलगाव, अंबाजोगाई व गेवराई या उपविभागामध्ये या तीन सॅनिटायझर व्हॅन फिरणार आहेत. शुभारंभप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे भारत राऊत, जनसंपर्क अधिकारी सपोनि.विलास हजारे यांच्यासह आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.