कोकण विभागात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित -
विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड
मुंबई- निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी जमातीच्या मेळाव्यात सामाविष्ठ झालेल्या कोकण विभागातील २०० जण आढळून आले आहेत. त्यांचा शोध झाला असून उर्वरित लोकांची माहिती घेण्यात येत आहे. असे कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी सांगितले.
शिवाजी दौंड म्हणाले की, निजामुद्दीन येथे तबलिगी ए-जमातीच्या मेळाव्यात कोकण विभागातील २०० जणांची यादी प्रशासनास प्राप्त झाली असून त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १३९ , रायगड जिल्ह्यातील ४२, रत्नागिरी जिल्ह्यातील ३, पालघर जिल्ह्यातील १६ यांचा समावेश आहे. प्रशासनास प्राप्त झालेल्या यादीतील काही लोक बाहेरच्या राज्यात असण्याची प्राथमिक शक्यता आहे, तर उर्वरित तपास गतीने सुरु आहे. कोकण विभागात २९० कामगार छावण्या असून ३० हजार लोकांना सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यांना वैद्यकीय सुविधेसोबतच निवारा आणि भोजनाचीही सोय करण्यात येत आहे. कोकण विभागात होणारे सर्व मोठे समारंभ रद्द करण्यात यावेत. अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कोकण विभागात ३ महिने पुरेल असा धान्यसाठा उपलब्ध आहे. असे त्यांनी सांगितले. वृध्द व अपंग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या कामगारांसाठी पासेस देण्याची व्यवस्था स्थानिक पातळीवर करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. छावणीत ठेवण्यात आलेल्या परप्रातींयाना आवश्यक त्या सुविधा देण्याच्या सूचना प्रशासकीय पातळीवर करण्यात आल्या आहेत. त्यात महिला व मुलांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत गर्दी होऊ नये. यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.