भाईंदर मध्ये पालिका शौचालये बनली जुगाऱ्यांचा अड्डा 

भाईंदर मध्ये पालिका शौचालये बनली जुगाऱ्यांचा अड्डा 


भाईंदर - महापालिकेने लोकांच्या सुविधेच्या नावाखाली बांधलेली सार्वजनिक शौचालये पालिकेच्या हलगर्जीपणा मुळे बेवारस होऊन चक्क जुगाऱ्यांचा अड्डा बनली आहेत. भाईंदरच्या गणेश देवल नगर मधील पालिका शौचालयांमध्ये खेळल्या जाणाऱ्या पत्ते जुगाराचे व्हिडिओ समोर आले आहेत. 
कोरोना मुळे लोकांना घरा बाहेर पडण्यास मनाई केली आहे. झोपडपट्टी भागात तर मनाई आदेश धुडकावणारी लोकं पाहुन पोलीसांनी देखील गस्त वाढवली आहे. परंतु महापालिकेने मात्र त्यांच्या स्वत:च्या सार्वजनिक शौचालयांना वाऱ्यावर सोडले असल्याने गणेश देवल नगर मधील पालिकेच्या सार्वजनिक शौचालयांचा ताबा परिसरातील काही टपोरी उनाड टप्पूनी घेतलेला आहे. ही टोळकी या शौचालयाच्या पॅसेज मध्येच तळ ठोकुन असतात. तेथे पत्त्यांचा जुगार खेळण्या पासुन शिवीगाळ आदी प्रकार सर्रास सुरु आहेत. 
वास्तविक महापालिकेने ठेकेदारांचे चांगभलं करण्यासाठी अवास्तव आणि वस्ती नसणाऱ्या ठिकाणी शौचालयं बांधली आहेत. अनेक शौचालयं वापरावीना बंदच आहेत. झोपडपट्टीच्या नावाखाली चक्क गृहसंकुलातील आरजीच्या भुखंडांवर सुध्दा  शौचालये बांधली आहेत. शिवाय खाडी पात्र परिसर, कांदळवनात तसेच मीठ विभागाच्या जागेत पर्यावरणाचा ऱ्हास करुन पालिकेने शौचालये बांधलेली आहेत. काही प्रकरणात पालिका अधिकारी - ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आता पालिकेची शौचालये जुगाऱ्यांचा अड्डा बनल्याने पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे.