तालुक्या-तालुक्यात भाजीपालाच्या दरात पक्षपातीपणा का? -पूजा मोरे
गेवराई - कोरोनामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतीमालाचे नुकसान होऊ नये, जिवनावश्यक वस्तु नागरिकांना मिळाव्यात म्हणून जिल्हाधिकार्यांनी प्रत्येक तालुक्यात तालुका संनियंत्रण समिती ठरवून भाजीपाला व फळांचे दर निश्चित केले आहेत. परंतु बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यात हे दर वेगवेगळे असून जिल्हाधिकार्यांनी जिल्हाभरात एकच दरपत्रक निश्चित करावे, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे यांनी केली आहे.
कोरोनामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. व्यापारी माल घ्यायला तयार नाही. त्यात एखादा व्यापारी तो घेण्यास तयार झाला तर किंमत पाडून मागत आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या पदरात काहीच पडत नाही अशी परिस्थिती आहे. शेतकर्यांना कष्टाने पिकवलेल्या मालाचा मोबदला मिळावा म्हणून शेतकरी आज स्वतःच बाजारपेठेत माल घेऊन जात आहेत. आणि शहरात तो विकत आहे. हे करतांना थोडी कसरत होत असली तरी ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ ही संकल्पना जोर घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. किराणा माल वाढीव किंमतीत काही दुकानदार विकत असल्याच्या काही बातम्या आल्या त्यानंतर बीड जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यात फळे व भाजीपाला थेट विक्रीसाठी तालुका सनियंत्रण समीती स्थापन केली. प्रत्येक तालुक्यात किराणा, फळे व भाजीपाला यासाठी कमाल दर निश्चित करण्यात आले. परंतु त्यात शेतकर्यांसोबत पक्षपातीपणा होताना दिसून येतोय. एखाद्या शेतकर्याने बीडमध्ये खरबूज विकले तर त्याची किंमत 20 रुपये प्रति किलो आणि तेच खरबूज गेवराईमध्ये विकले तर 8 रुपये किलो असा भेदभाव केला आहे. एवढ्या कमी किंमतीत टरबूज व खरबूज विकणे शक्य नाही. कारण टरबूज आणि खरबूज बीडमध्ये कोणत्याही तालुक्यात पिकवला तरी या पिकाला एकरी 70 ते 80 हजारच खर्च करावा लागतो. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच भाव असावा. टरबूज, मोसंबी, पपई या फळांच्या बाबतीत ही असाच पक्षपातीपणा झालेला आहे. यामुळे शेतकर्यांची स्वतः माल विकून देखील निराशा होत आहे. कधी नव्हे ते शेतकरी थेट ग्राहकांपर्यंत पोहचत आह. अश्या परिस्थितीमध्ये प्रशासनाने शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. जिल्हाधिकारी राहूल रेखावार साहेब मराठवाड्यातील आहेत. येथील भुमिपुत्रांच्या समस्या ते जाणुन आहेत. त्यामुळे त्यांनी संपूर्ण जिल्हयातील शेतकर्यांसाठी एकच दर निश्चित करावा. शेतकर्यांमध्ये तालुकानिहाय भेदभाव करू नये, अशी मागणी पंचायत समिती सदस्य तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजाताई मोरे यांनी केली आहे.