संचारबंदीचं उल्लंघन करणारे आ. सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल

 


संचारबंदीचं उल्लंघन करणारे आ. सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल


बीड - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशासह राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      संचारबंदीत गावाकडे परतणाऱ्या आष्टी तालुक्यातील ऊसतोड मजुरांना पोलिसांनी मारहाण केल्याची घटना समजताच भाजपा आमदार सुरेश धस यांनी बुधवारी रात्री खेड येथे जाऊन ठिय्या मांडला. पोलिसांची भूमिका आणि सरकारचे धोरण याविषयी टीकाही केली. त्यामुळे जिल्हाबंदी, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आमदार सुरेश धस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र इतर जिल्ह्यात कामासाठी तसेच ऊस तोडणीसाठी गेलेले नागरिक परत येत आहेत. बुधवारी रात्री परजिल्ह्यात ऊस तोडणीसाठी गेलेले मजूर आपल्या गावाकडे परतत असताना त्यांना खेड व भिगवण ( ता.कर्जत जि. पुणे) येथे जिल्ह्याच्या हद्दीत रोखून पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती. ही घटना कळतात भाजपा आमदार सुरेश धस यांनी रात्रीच तत्काळ खेड येथे जाऊन ऊसतोड मजुरांची भेट घेतली पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रात्री दोन वाजता त्यांनी ठिय्या आंदोलनही केले. शिवाय पोलिसांची भूमिका आणि सरकारच्या धोरणावरही त्यांनी टिका केली.जिल्हा बंदीचे आदेश डावलून ऊसतोड मजुरांची भेट घेऊन ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणी शुक्रवारी पोलीस नाईक प्रशांत क्षिरसागर यांच्या तक्रारीवरून आमदार सुरेश धस यांनी संचार बंदीचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात कलम 188, 269, 270, 51 (ब) नुसार आष्टी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे


आ. सुरेश धस - 
 जनतेची सेवा करत असताना माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी मी जनतेसाठी काम करतच राहणार आहे. जनतेचा मी एक सालकरी आहे. जनतेच्या अडी अडचणींना उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे असे गुन्हे दाखल झाल्याने मला काही फरक पडत नाही.