अफवा पसरवली : 'समिर सरकार' सह 'एम खान' व्हॉटसअप ग्रुपचे दोन सदस्य अटकेत
बीड: मीडिया आणि प्रशासन यांच्या विरोधात जाणीवपुर्वक द्वेष पसरेल अशा प्रकारचा मेसेज व अफवा फेसबूकच्या ‘समीर सरकार’ या अकाऊंटवरून पसरवली म्हणून शेख समिर शेख सत्तार (वय 24, महंमदीया कॉलनी पेठ बीड) व तीच पोस्ट पुन्हा सय्यद खय्यूम सय्यद जमीर याने ‘एम खान’ नावाच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर पोस्ट केली. त्यामुळे सय्यद खय्यूम सह व्हॉटसअॅप ग्रुपचा अॅडमीन सलीम जावेद शेरखाँ (वय 30, रा.दाऊदपूर बीड) याच्या विरोधात पेठबीड पोलीस ठाणे बीड येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, फेसबूकवर पोस्ट केली म्हणून शेख समिर शेख सत्तार आणि व्हॉटसवर पोस्ट केली म्हणून सय्यद खय्यूम सय्यद जमीर तर व्हॉटसअॅपचा ग्रुप अॅडमीन या नात्याने पोस्ट करण्यास संमती दिली म्हणून सलीम जावेद शेरखाँ यांच्या विरोधात पो.ना. राहूल रतनलाल गुरखुदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 505 (2), 34 भादंविनुसार पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या तिघांनाही पोलीसांनी अटक केली असून आतापर्यंत अफवा पसरविणार्यांविरोधात बीड जिल्ह्यात 32 गुन्हे नोंद झाले आहेत.
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल 24 तास सोशल मीडियावर नजर ठेऊन आहे. त्यामुळे कोणीही अफवा पसरवणारे, द्वेष व तेढ वाढवणारे मेसेज फॉरवर्ड करून नयेत, अशा सुचना पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.