गर्भवती महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यास चालकाचा नकार,
संंतप्त नातेवाईकांकडून रूग्णवाहिका पेटवून देण्याचा प्रयत्न
बीड- जिल्ह्यातील आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात आलेल्या गर्भवती महिलेला उपचार करून पुढील उपचारासाठी बीड येथे घेवुन जाण्यासाठी 108 क्रमांकाची टोल फ्री रूग्णवाहिका उपलब्ध असुनही दिली जात नसल्याने संतप्त नातेवाईकांनी रूग्ण वाहिकेवर दगडफेक करून ती डिझेलने पेटवुन दिल्याची घटना आष्टीत घडली आहे .
आष्टी तालुक्यातील खरडगव्हाण येथील तीन महिन्याच्या एक गर्भवती महिलेला तालुक्यातील कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातुन आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. सदरील महिलेच्या गर्भाशयाला मोठी ईजा झाल्याने तिला पुढील उपचारासाठी बीड येथे हलवण्यात यावे असे आष्टी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगीतले होते. आष्टी येथील रूग्णालयातील सदरील गर्भवती महिलेला 108 क्रमांकाच्या टोल फ्री रुग्णवाहिकेतून तातडीने घेवुन जाण्याची मागणी कार मधुन आलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी केली.
रूग्णवाहिकेचा चालक सय्यद शहाबाज रज्जाक (वय 26 रा. मुर्शदपुर) उपलब्ध होता. तरीदेखील,चालकाने रूग्णाच्या नातेवाईकांना तुम्ही 108 वर कॉल करा आम्हाला कॉल आल्यांनतरच पुढील प्रक्रिया हाेईल असे सांगितले. तेंव्हा नातेवाईक म्हणाले की चालक म्हणून तुम्ही उपलब्ध आहात. त्यामुळे तुम्हीच आमच्या बरोबर तातडीने चला. पण, नंतर रुग्णवाहिकेवर डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण चालकाने त्याने सांगितले. त्यांनतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेवर दगडफेक करून ती डिझेलने पेटवुन देण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असुन या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.