माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर होम क्वारंटाइन; जिल्हाधिकारी यांची माहिती
बीड - सध्या परिस्थिति बिकट होत चाललेली असताना मुंबईतील कोळीवाडा वरळी भागात सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने अख्खा परिसर सील करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत त्याच भागात राहणारे बीडचे शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे बीडमध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास दाखल झाले होते. त्यांना क्वारंटाइन करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केल्यानंतर आरोग्य विभागाने तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन होण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊन असताना जयदत्त क्षीरसागर हे बीडमध्ये आलेच कसे असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी तक्रार केली होती. त्यात म्हटले की, क्षीरसागर कुटंबिय आणि वाहन चालक जिल्हाबंदी मोडून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. ते मुंबईत सील केलेल्या कोळीवाडा भागात राहत होते. त्या भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून अन्य लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे अशी तक्रार आ.संदीप क्षीरसागर गटाचे नगरसेवक अमर नाईकवाडे, अश्पाक इनामदार, भैय्यासाहेब मोरे, रणजित बनसोडे, प्रभाकर पोकळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस, एक आरोग्य पथक घरी दाखल झाले.त्यांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइनचा सल्ला दिला. दरम्यान, जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाबंदी मोडून जिल्ह्यात प्रवेश केलाच कसा? याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील नगरसेवकांनी केली आहे
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर होम क्वारंटाइन; जिल्हाधिकारी यांची माहिती