माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना क्वारंटाइन करण्याची मागणी

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना क्वारंटाइन करण्याची मागणी
बीड -  वरळी कोळीवाडा भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडले आहेत. त्याच भागात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर राहत होते. मात्र राज्यात लॉकडाऊन असताना ते, त्यांचं कुटुंबिय आणि वाहन चालक हे जिल्हाबंदी मोडून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून त्यांच्या हातावर क्वारंटाइनचे शिक्के मारून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना शासकीय रुग्णालय व इतर ठिकाणी क्वारंटाइन करावे, अशी तक्रार बीड नगर परिषदेचे नगरसेवक अमर नाईकवाडे, अश्पाक इनामदार, भैय्यासाहेब मोरे, रणजित बनसोडे, प्रभाकर पोकळे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
     तक्रारीत म्हटले आहे की, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर मुंबईत त्यांच्या कुटुंबियासोबत कोळीवाडा भागात राहत होते. याच भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. त्यामुळे माजी मंत्री क्षीरसागर जिल्हाबंदी मोडून बीड जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. ते सध्या आ.संदीप क्षीरसागर रहात असलेल्या नगर रोड यथील निवासस्थानी थांबलेले आहेत. त्यांच्या सोबत त्यांचं कुटूंब आणि गाडी चालकही आलेले आहेत. या सर्वांची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यांच्यामुळे आ.संदिप क्षीरसागर व त्यांच्या कुटुंबियाला कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी जिल्हाबंदी मोडून जिल्ह्यात प्रवेश कसा काय केला? त्यांनी जमाबंदीचे आदेशही मोडले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा असेही तक्रारीत म्हटले आहे. आता यामुळे क्षीरसागर कुटुंबातील कुटूंब कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हाशल्य चिकित्सक, पोलीस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.