लॉकडाऊनमुळे उच्चशिक्षीत जोडी घरातच विवाहबध्द
श्रीगोंदे - कोरोना व्हायरसमुळे आता लग्नाची परिभाषा बदलून जाणार आहे. मोठी अवाढव्य खर्चाची लग्न कोरोनामुळे कदाचित कालबाह्य झालेली दिसतील. कालच सिंधुदूर्गमधील एक जोडी लॉकडाऊनच्या रस्त्यावरून दुचाकीने जात असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. आज श्रीगोंदा येथे स्पर्धा परिक्षेचे क्लास घेणारे आणि पोलीस उप निरीक्षक असलेल्या एका मुलीच्या विवाहाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील वसंत निंभोरे यांचे चिरंजीव किरण आणि येळपणे येथील वाल्मीक डफळ यांची कन्या राणी यांचा सहा महिन्यापुर्वी विवाह निश्चित झाला होता. मात्र लॉकडाऊन वाढल्याने या विवाहाला ऑनलाईन वर्हाडी बोलविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार हा विवाह आज सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास संपन्न झाला. या विवाहाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो वर्हाडी साक्षीदार ठरले. अनेकांनी घरात बसूनच ऑनलाईन अक्षदाही टाकल्या. घरातच झालेल्या या विवाहासाठी आई, वडील आणि भटजी यांची उपस्थिती होती. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून हा विवाह संपन्न झाला. विवाहात वाचलेला खर्चातील काही रकमेतून स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या पुण्यातील दोन हजार विद्यार्थ्यांना दोन वेळा भोजनाचा आस्वाद देण्यात येणार आहे. वर किरण हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना वास्तव कट्टा या यु टुब चॅनेलच्या माध्यमातून काम करीत आहे. तर राणी ही मनमाड येथे पोलिस उपनिरीक्षक आहेत.
,