१५ कोटी ७३ लाखाच्या बिलाची  चौकशी करून रद्द करावी आ मेटेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

१५ कोटी ७३ लाखाच्या बिलाची  चौकशी करून रद्द करावी आ मेटेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी


बीड  :- सध्या संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला असताना बीडच्या पंचायत समितीत मात्र वेगळाच कारभार सुरु आहे. लोकांच्या दुर्लक्षाचा फायदा घेत नरेगाची कुशल बिले चुकीच्या पद्धतीने काढण्याचा प्रताप चालवला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर काल आ. विनायकराव मेटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करत याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. बीड पंचायत समितीमधील नरेगा कक्ष व गटविकास अधिकारी यांनी कोणत्याही नरेगा कामाची, कागदपत्राची, त्यावरील बिलाची सबधित कामाच्या एजन्सीची तपासणी न करता चुकीच्या पद्धतीने कुशलची बिले मार्च २०१९ - २० या वर्षामध्ये एकूण १५ कोटी ७३ लाखाची  ऑनलाईन केलेली आहेत. या सर्व बिलांची चौकशी करून सबंधीत विभागातील कर्मचाऱ्यावर कारवाई करून चुकीच्या पद्धतीने ऑनलाईन झालेली बिले रद्द करण्यात यावीत अशी मागणी आ. विनायकराव मेटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे.
   पंचायत समितीत सर्वसामान्यांचा पैसा हा सर्वसामान्यांच्या हितासाठी खर्च होणे अपेक्षित आहे मात्र हे भ्रष्टाचाराचे कुरण बनवण्याचे काम काही लोकांनी सुरु केले आहे. पंचायत समितीत कुशल बिले चक्क १५ कोटी ७३ लाख रुपयांची चुकीच्या पद्धतीने काढली जात असल्याचे दिसून येत आहे. याबाबतीत सबंधित विभागातील कर्मचार्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काल जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आयुक्तांकडे करण्यात आलेली असून कोरोनासह जिल्हाधिकारी यांनी या विषयावर थोडा वेळ काढत हि चुकीची पद्धत बंद करायला हवी अशी मागणी आ. मेटे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे. सोबतच मागील एक दोन महिन्यांच्या कार्यकाळामध्ये छाननी समितीची मान्यता नसताना देखील खूप गावांमध्ये अनेक कामांची बोगस वर्ककोड निघालेले आहेत व त्या वर्ककोडनुसार मस्टर देखील निघालेले आहेत याबाबत देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी आ मेटे यांनी केली आहे. यावेळी आ मेटे यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने बिले काढलेल्या गावांची यादी देखील जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.