बीड पोलीसांनी केल्या 440 दुचाकी जप्त
वाहन घेवून घराबाहेर पडल्यास होणार कारवाई
बीड : सकाळी 7 ते 9: 30 या वेळेत संचारबंदी शिथीलीकरण असतांना अत्यावश्यक सेवा वगळता दुचाकी घेवून शहरात फिरणार्या 440 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई सोमवारी (दि.13) सकाळी 7 ते 9: 30 या वेळेत वाहतूक शाखेने केली आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. संचारबंदीकाळामध्ये जिल्ह्यात अवैध धंदे, विनाकारण रस्त्यावर फिरणे, नागरिकांची फसवणूक करणे अशा व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीसांना पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिले होते. सोमवारी सकाळी साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर नाका, बीड शहर पोलीस ठाणे समोर, शिवाजीनगर पोलीस ठाणे समोर अत्यावश्यक सेवा वगळता दुचाकी घेवून फिरणार्या 440 दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे पोनि.राजीव तळेकर व त्यांच्या टिमने केली आहे. नागरिकांनी संचारबंदी शिथीलीकरणच्या काळामध्ये काही अत्यावश्यक सेवा प्राप्त करायच्या असतील तर त्या पायी जावून प्राप्त कराव्यात. तसेच पेट्रोल पंपचालकांनीही खाजगी वाहनांना इंधन पुरवठा करु नये अन्यथा कारवाई केली जाईल. अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार दिली आहे.