मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाचे २२ रुग्ण
तर एकाचा मृत्यू
भाईंदर - मीरा-भाईंदर मधील कोरोनाची लागण झालेली संख्या दररोज वाढत चालली आहे. एका दिवसात नविन ५ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे आता शहरातील कोरोना रुग्णांची संख्या २२ झाली आहे. तर कोरोनामुळे ५० वर्षाच्या व्यक्तीचा शहरात पहिला मृत्यू झाला आहे.
मिरा भाईंदरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. प्रशासन जागरूकता घेत असले तरी शहरातील नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच रुग्ण संख्येत वाढ होत आहे. सोशल डिस्टनिंग पाळताना नागरिक आढळून येत नाहीत. बाजारामध्ये गर्दी करत आहेत. या गर्दीमुळेच रुग्णामध्ये वाढ होत आहे. प्रशासन हे गांभीर्याने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करत आहे. त्याला नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे, अन्यथा यामध्ये वाढ होऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिरा रोड येथील ५० वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हा मिरा भाईंदर मधील कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. नवीन मिळून आलेल्या ५ रुग्णांमध्ये ४ पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे रुग्ण मिरा रोड आरएनए ब्रॉडवे ,भाईंदर येथील रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अगोदर १७ जणांना कोरोनाची लागण झाली होती आता त्यात पुन्हा पाच वाढ होऊन २२ जण झाले आहेत. जोगेश्वरीच्या ट्रामा सेंटर रुग्णालयात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झालाची माहिती पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली. मिरा भाईंदरमध्ये ५५४ नागरिकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसंच ४५० नागरिकांना घरातच अलगीकरण करण्यात आले आहे. रोज या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.आतापर्यंत १२२ स्वॅब तपासण्यांमध्ये २२ रुग्ण हे पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.तर ५२ निगेटिव्ह असून ४८ जणांचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही.पोलिसांनी रुग्ण वास्तव्य करीत असलेल्या इमारतीकडे जाणारे रस्ते प्रतिबंधित केले आहेत.
शहरातील नागरिकांनी घरातच रहावे बाहेर निघू नये , प्रशासनाला सहकार्य करावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.