टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणारे पाणी सुलभ शौचालये मोफत उपलब्ध करून देण्याची महापौरांची मागणी
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी संचारबंदीच्या काळात शहरातील सार्वजनिक शौचालय आणि झोपडपट्टी मध्ये टँकरद्वारे पुरवठा करण्यात येणारे पाणी हे मोफत देण्याची सूचना महापौर यांनी शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांना देण्यात आल्याचे सांगितले आहे.
कोरोनामुळे गेल्या आठवड्यापासून सगळीकडे संचारबंदी सुरू आहे. या संचारबंदीमुळे सर्व नागरिक हे घरीच राहत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक असलेल्या सुविधा या उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शहरातील विविध झोपडपट्टी व नागरी वस्त्यांमधील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील अनेक लहान वस्त्यामध्ये नळ जोडणी देण्यात आलेली नाही. त्यांना पाणी देण्यासाठी पालिकेकडून टँकरद्वारे पिण्याचे पाणी काही शुल्क आकारुन पुरवठा करण्यात येते. तसेच त्यांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील अनेक ठिकाणी पालिकेने शौचालये बनवली आहेत. ती शौचालये संस्थेला चालवण्यासाठी देण्यात आली आहेत. संस्थेकडून त्याचा वापर करण्यासाठी शुल्क आकारले जाते. संचारबंदीमुळे सर्वसामान्य यांच्याकडे रोजगार नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हाताला काम नसल्यामुळे एकवेळचे अन्न कसे मिळेल याचा विचार दररोज करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना या संचारबंदीच्या काळात शौचालय व पाण्यासाठी पैसे देणे शक्य होत नसल्याने त्यांना पालिकेकडून पाणी व सुलभ शौचालय मोफत देण्याच्या सूचना महापौर जोत्सना हसनाळे यांनी मनपा शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांना सुचना दिल्या आहेत असे महापौर यांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
शहरातील सर्व शासकीय यंत्रणेबरोबरच निमशासकीय व्यक्तिद्वारे अनेक संस्था, मंडळे कोरोना विषाणूच्या लढाईत लोकांच्या सेवेसाठी सामाजिक भूमिकेतून प्रशासनाला आणि जनतेला मदतीचा हात पुढे करत आहे.संचारबंदी मुळे अगोदरच जनतेला अनेक संकटाशी सामना करावा लागत आहे.जनतेने एकमेकापासून अंतर ठेवावे हाच पर्याय आहे. म्हणून बाहेर जाणे टाळा घरात परिवारात आनंदाने दिवस घालवा, परिवाराला वेळ द्या हीच देश सेवा आणि समाजसेवा होईल असे कळकळीचे आवाहन महापौर जोत्सना हसनाळे यांनी केले आहे.