पालिकेच्या आशीर्वादाने घोडबंदर गांवात अनधिकृत बांधकाम
मिरारोड- मीरा भाईंदर शहरात अनधिकृत बांधकामे जोरात सुरू आहेत. घोडबंदर गांव, जरीमरी मंदिराजवळ सर्व्हे नं.२४७, हिस्सा नं.१, मालमत्ता क्र.००१००२३२४०००० ही जागा सामाईक मालकीची असून या जागेत हॉटन घोन्सालवीस यांचं घर असून त्याची दुरुस्ती करण्यासाठी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी पालिकेला अर्ज केला होता. त्यानंतर बांधकाम अभियंता राजेश म्हात्रे यांनी २० फेब्रुवारी २०१९ रोजी संरचनात्मक तपासणी अहवाल दिल्यानंतर सदर दुरुस्तीस परवानगी देण्यात आली. परंतु सदर घराची दुरुस्ती करण्याऐवजी त्या जागी तीन मजली इमारतीचं बांधकाम सुरु झालं. याबाबत सामाईक हिस्सेदार नॉटली घोन्सालवीस यांनी २८ मे १९ रोजी प्रभाग क्र.४ चे अधिकारी नरेंद्र चव्हाण यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली तरीही या बांधकामावर कारवाई केली नसून ते बांधकाम अद्यापही सुरूच आहे. त्यानंतर नॉटली यांनी तत्कालीन आयुक्त बालाजी खतगांवकर यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तानीही सदर तक्रारीला केराची टोपली दाखविल्याने नॉटली यांनी २१ नोव्हेंबर २०१९ रोजी सदर बांधकामास न्यायालयाकडून स्थगिती आणली. हॉटन घोन्सालविस यांनी दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेला दिलेली कागदपत्रे छायाचित्रे व न्यायालयास दिलेली कागदपत्रे / छायाचित्रे वेगवेगळी दाखवून न्यायालयाची दिशाभूल केलेली आहे. न्यायालयाच्या स्थगितीलाही न जुमानता प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांच्या आशीर्वादाने सदर अनधिकृत इमारतीचे वाढीव बांधकाम पुर्णत्वास आले आहे.
<no title>