महापौर निवास झाले कबुतर खाना
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महापौर निवासाची दुरावस्था
नामदेव काशिद
मिरारोड - मीरा भाईंदर महानगरपालिकेने महापौर व आयुक्त यांना रहाण्यासाठी विकासकाकडून टीडीआरच्या बदल्यात भव्य असे बंगले बनवून मिळाले. प्रत्येक येणारे आयुक्त हे निवासाचा वापर करत असल्यामुळे ते चांगल्या स्थितीत आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून महापौर निवासात कोणी राहत नसल्यामुळे त्या निवासाची अत्यंत दुरावस्था निर्माण झाली आहे. काही काचा फुटल्यामुळे कबुतरांनी बंगल्याचा ताबा घेतला आहे. त्यामुळे तेथे गेल्यानंतर असे वाटते की महापौर निवास हे कबुतर खाना बनले आहे. प्रशासनाने या निवासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे महापौर निवासाची दुरावस्था झालेली आहे.
मीरा भाईंदर महापालिकेची स्थापना २००२ साली झाली. त्यावेळी प्रथम महापौर म्हणून मायरा मेंडोसा यांची नियुक्ती झाली. २००३ साली महापौर निवास बनवले गेले. २००५ साली निर्मला सावळे यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर महापौर निवासात त्या राहायला गेल्या. त्या राहायला आल्यानंतर अडीच वर्षे निवासाची साफसफाई व निगराणी व्यवस्थित राहिली. परंतु त्यांच्यानंतर आतापर्यंत अनेक महापौर झाले ते श्रीमंत असल्याकारणाने महापौर निवासात कोणीही राहायला आले नाही. त्यानंतर तुळशीदास म्हात्रे महापौर झाल्यानंतर ते काही महिने फक्त येत जात असत परंतु नंतर कोणीही त्याकडे फिरकले नाही. निवडून येणाऱ्या प्रत्येक महापौर यांची जबाबदारी आहे की राहायला गेले नाही तरी त्यांनी निवासाची देखभाल करणे आवश्यक आहे परंतु असे कोणीही केले नाही त्यामुळे गेल्या १३ वर्षात महापौर निवासाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. पालिका प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. महापौर निवासामध्ये सगळीकडे कबुतरे आहेत . कबुतरांनी निवासात घाण करून ठेवली आहे. सगळीकडे दुर्गंधी येत आहे. पालिकेकडून निवासाची साफसफाई ही करण्यात येत नाही. पालिकेने खर्च केलेले जनतेचे कररूपी पैसे त्याचा वापर व पालिकेने त्याची देखभाल न केल्याने त्या कररूपी पैशाचा अपव्यय होत आहे. निवासाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, उद्यान विभाग यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज निवासाची ही हालत झाली आहे.
नवनियुक्त महापौर जोत्सना हसनाळे या महापौर निवासात राहण्यासाठी जाणार आहेत. शहराच्या प्रथम नागरिक यांचे महापौर निवास याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. महापौर हसनाळे यांनी निवासाची पाहणी केली त्यावेळी निवासात अत्यंत घाणीचे साम्राज्य व सगळीकडे दुरावस्था झालेली दिसून आली आहे. लाखो रुपये खर्च करून तयार केलेले फर्निचर पूर्ण खराब झालेले आहे. सुरक्षारक्षक आहेत तेच निवासात राहत आहेत. कबूतरामुळे अत्यंत दुर्गंधी पसरलेली आहे. हसनाळे या महापौर निवासात राहण्यासाठी जाणार आहेत. परंतु तिथे असलेल्या दुर्गंधीमुळे त्या निवासात राहायला जाणार नाहीत अशी माहिती मिळत आहे. कबुतराची विष्ठा मानवाच्या आरोग्यास घातक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निवासात कबुतरे व त्यांची विष्ठा सगळीकडे आहे त्यामुळे साफसफाई केली तरी अनेक महिने तेथील दुर्गंधी जाणार नाही असे हसनाळे यांनी सांगितले. पालिकेने उभारलेल्या भव्य वास्तूची दुरावस्था झालेली पाहून त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेला देखभाल करता येत नसेल तर अशा वास्तू उभारू नये त्यात जनतेचा कररूपी पैसा व्यर्थ घालवू नये अशी हसनाळे यांनी प्रशासनावर टीका केली आहे.
महापौर निवासात गेल्या तेरा वर्षांपासून कोणतेही महापौर राहायला गेले नाहीत त्यामुळे निवासाची दुरावस्था झालेली आहे. त्याची साफसफाई व दुरुस्ती केल्यानंतर ते पुन्हा चांगले होईल परंतु त्याचा नियमित वापर होणे आवश्यक आहे.
दीपक खांबीत - कार्यकारी अभियंता - सार्वजनिक बांधकाम विभाग