पुण्यावरून येऊन रुबाबदारपणे संचारबंदीत फिरणाऱ्या तरुणावर अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पाटोदा - (प्रतिनिधी) कोरोना आजाराने देशभरात थैमान घातले असुन या आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. संचारबंदी असताना , रस्त्यावर फिरु नका असे अवाहन देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, पोलिस, आरोग्य विभाग,जागरूक नागरिक करत असताना काही हावशी व कोरोनाचे गांभीर्य नसणारे टवाळखोर रस्त्यावर फिरताना दिसुन येत आहेत. आजाराचे गांभीर्य नसणाऱ्या अशाच एका तरुणाला अंमळनेर पोलिसांनी पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
बीड जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना आजाराचा रूग्ण आढळून आला नसला तरी मुंबई-पुण्यावरुन बीड जिल्ह्यात आलेल्या हजारो नागरिकांपैकी ३५२ जणांना कोरोना आजारांची लक्षणे असल्याचे आढळून आले आहे. १५ एप्रिल पर्यंत देशात या आजाराचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासन खबरदारी म्हणुन संचारबंदी लागु करीत आहे. परंतु नागरिक अजूनही रस्त्यावर गर्दी करीत पुणे-मुंबईवरुन आलेले नागरिक आपण गावाकडे मौजमजा करण्यासाठी आलो आहोत या अविर्भावात वागत असुन आजाराचे गांभीर्य लक्षात न घेता बिनधास्त जनतेत फिरत आहेत. अंमळनेर पोलिसांनी संचारबंदीत नगर रोडवर, आरव हॉटेल शेजारी मोटारसायकलवरून फिरणाऱ्या मदमापुरी येथील आणि पुणे येथून आलेल्या विठ्ठल किसन बेदरे या तरुणावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न करता कोरोना आजार पसरु नये यासाठी संचारबंदी असताना तसेच तोंडाला मास्क न लावता फिरत असताना आढळून आल्याने त्याच्यावर कलम १८८,२६९,२७० अन्वये गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक करण्यात आली आहे. दरम्यान मोकाट फिरणाऱ्या मुंबई-पुण्याच्या तरुणांनी धसका घेतला असुन ,रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येकावर गुन्हा दाखल करण्याचा ईशारा स.पो.नि. श्यामकुमार डोंगरे यांनी दिला आहे . सदरील कार्यवाही श्यामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार एस.बी.काकडे,विलास गुंडाळे, फुलेवाड आदिंनी केली.